Ad will apear here
Next
अपंगत्वावर मात करून शेतकऱ्याने उभारला वातानुकूलित पोल्ट्रीफार्म
जुन्नरमधील उत्तम डुकरे यांची प्रेरणादायी कामगिरी

पुणे : ‘शरीर अपंग असले म्हणून काय झाले, मनाला पंगुत्व येऊ देऊ नका, तुम्हीही यशाची शिखरे गाठू शकता,’ हा संदेश पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील औरंगपूर येथील उत्तम डुकरे यांनी स्वतःच्या उदाहरणातून दिला आहे. पायाने अपंग असूनही, त्यांनी जिद्दीने कुक्कुटपालन व्यवसाय उभारला. इतकेच नव्हे, तर त्यांनी गावातील पहिला वातानुकूलित आणि स्वयंचलित अत्याधुनिक पोल्ट्रीफार्म उभारला असून, त्यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द असेल, तर माणूस किती मोठी झेप घेऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण डुकरे यांनी समाजासमोर ठेवले आहे. 

उत्तम डुकरे
सध्याच्या सर्वाधिक चिंतेचा विषय असलेल्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर डुकरे यांचे उदाहरण शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी आहे. पाचवीत असताना पायाला लाकूड लागण्याचे निमित्त झाले आणि डुकरे यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. खेळण्या-बागडण्याच्या वयात आलेल्या या अपंगत्वाने हतबल न होता, त्यांनी खंबीरपणे परिस्थितीचा सामना केला. चिकाटीने महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर ‘आयटीआय’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. घरची शेती असली, तरी पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे केवळ सहामाही उत्पादन घेणे शक्य होत असे. त्यामुळे शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहणे शक्य नव्हते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी टीव्ही, रेडिओ आदी उपकरणे दुरुस्तीचे केंद्र त्यांनी सुरू केले. त्यात जम बसल्यावर त्यांचे लग्न झाले. पत्नी संगीता यांचीही त्यांना समर्थ साथ लाभली. 

२००७मध्ये उत्तम डुकरे यांनी नवीन व्यवसायात उतरायचे ठरवले आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. १५० चौरस फूट जागेतील उघड्या शेडमध्ये ४५० पक्ष्यांपासून त्यांनी सुरुवात केली. त्या वेळी पहिल्या वर्षी त्यांना २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या क्षेत्रातील एका नामवंत कंपनीकडून पक्षी पाळायला दिले जायचे. हळूहळू या व्यवसायातील बारकावे, व्यवस्थापन शिकून घेऊन त्यांनी त्यात कौशल्य मिळवले. व्यवसाय वाढवत नेला. शेडची व्याप्ती २०० फुटांपर्यंत वाढवली. त्यामुळे पक्ष्यांची संख्याही वाढल्याने उत्पन्नातही भर पडली. 

हळूहळू १२ वर्षांच्या प्रवासात शेडचा आकार १२ हजार चौरस फुटांपर्यंत वाढवण्यात आला. उघड्या शेडमुळे वास यायचा, माश्या असायच्या; पण त्यावर त्यांना उपाय माहीत नव्हता. दरम्यान, इस्रायल आणि थायलंडमधील तज्ज्ञांनी त्यांच्या गावाला भेट दिली. त्या वेळी वातानुकूलित स्वयंचलित पोल्ट्रीफार्मची माहिती त्यांनी दिली. या तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यावर त्यांनी दोन शेडपैकी एक शेड पूर्णपणे वातानुकूलित आणि स्वयंचलित केली. 


या वातानुकूलित आणि स्वयंचलित शेडमध्ये कोंबड्यांना खाद्य घालण्याचे कामही यंत्राद्वारे केले जाते. पोल्ट्रीफार्मची क्षमता सोळा हजार पक्ष्यांपर्यंत वाढवण्यात आली. एक दिवस वयाचा पक्षी आणून, त्याचे संगोपन केले जाते. ३० दिवसांनंतर पक्षी विण्यास तयार होतो. सर्वसाधारण शेडमध्ये पक्ष्याची पूर्ण वाढ होण्यासाठी ४५ दिवस लागतात; मात्र या वातानुकूलित शेडमध्ये ३० दिवसांत पक्षी तयार होतात. त्यामुळे दहा दिवसांच्या खाद्याची बचत होते. खाद्यावर होणारा खर्च कमी होतो. पर्यायाने उत्पन्न वाढते. वातानुकूलित शेड असल्याने जास्त पक्षी ठेवता येतात. स्वच्छता करणे सोपे जाते. दुर्गंध, कचरा नसल्याने पक्षीही उत्तम वजनाचे, आरोग्यपूर्ण होतात. यामुळे किंमतही चांगली मिळते. यातून त्यांना तीस टन उत्पादन मिळते. शेडमधून पूर्वी सुमारे एक ते दीड लाखाचा नफा व्हायचा. तो आता महिन्याला दोन ते अडीच लाख रुपयांवर गेला आहे. 


‘अत्याधुनिक पोल्ट्रीफार्मबाबत मार्गदर्शन मिळाल्यावर मी असा पोल्ट्रीफार्म उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १२ लाख रुपये खर्च होता. त्यामुळे सध्या एकच शेड वातानुकूलित केली आहे. या शेडसाठी स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे असते. त्यासाठी कॉस्टिक सोडा ३० किलो आणि ३० लिटर पाणी रात्रभर भिजवून ठेवले जाते आणि दुसऱ्या दिवशी शेडमध्ये टाकले जाते. त्यानंतर शेडमध्ये फ्लोअरिंग करणे गरजेचे असते. त्यासाठी तूस टाकली जाते. पक्षी विकल्यानंतर या तुसापासून झालेले खतदेखील विक्रीसाठी उपलब्ध होते. ऊस, कांदा, हरभरा या पिकांना हे खत सेंद्रिय खत म्हणून उपयुक्त ठरते. एका ट्रॉलीला साडेचार हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यातूनही चांगली कमाई  होते. अशी दुहेरी कमाई होत असल्याने पोल्ट्रीफार्मचा व्यवसाय लाभदायी ठरला आहे,’ असे उत्तम डुकरे यांनी सांगितले. 

ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास याद्वारे लाखोंचे उत्पन्न मिळवता येते, हे डुकरे यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे. अनेक शेतकरी त्यांच्या पोल्ट्रीफार्मला भेट देऊन या नव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. 

उत्तम डुकरे यांच्यासाठी अपंगत्व हे अडथळा न बनता उत्तुंग झेप घेण्यासाठीचे कारण ठरले. उत्तम डुकरे यांनी अपंगत्वावर मात करून मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

संपर्क : ७०२०२ ५०१९८

(उत्तम डुकरे यांच्या पोल्ट्रीफार्मची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZXBBZ
Similar Posts
माती-पाण्याविना शेती; नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांची मुले दुबईला पुणे : माती व पाण्याशिवाय केवळ हवेतील प्राणवायूवर केल्या जाणाऱ्या शेतीचे ‘एरोपोनिक्स’ हे नवीन तंत्रज्ञान अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेने मंगळावर शेती करण्यासाठी विकसित केले आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकण्यासाठी पुण्यात शिकणारी शेतकऱ्यांची पाच मुले दुबईला जात आहेत. गणेश अहेर, सौरभ चौधरी, अबूबाकर शेख, मदिपल्ली
उद्योजकता विकासासाठी बीव्हीजी-डिक्की एकत्र पुणे : शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण करण्यासाठी ‘बीव्हीजी उद्योग समूह’ आणि ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स’ (डिक्की) एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी नुकतीच एका कार्यक्रमात दिली.
ग्राहकांना रास्त नि शेतकऱ्यांना जास्त भाव देणारे सेंद्रिय भाजीपाल्याचे ‘डॉ. खर्डे मॉडेल’ पुणे/पिंपरी : शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके यांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे त्यांचे अंश शेतीमालात उतरतात. अशी कृषी उत्पादने मानवी आरोग्याला घातक असल्याने सेंद्रिय उत्पादने आहारात असण्याची गरज आहे; मात्र सेंद्रिय उत्पादनांचे दर जास्त असल्याने मध्यमवर्गीयांना ती परवडत नाहीत. शिवाय, त्यांची विक्री किंमत
बँक ऑफ बडोदातर्फे किसान पंधरवड्याचे आयोजन पुणे : बँक ऑफ बडोदाने शेतकऱ्यांसाठी एक ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान बडोदा किसान पंधरवड्याचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत शेती क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण वाढवण्याचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश आहे,’ अशी माहिती बँकेच्या पुणे परिमंडळाचे प्रमुख के. के. चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language